उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
स्वयंवराचा भरला मंडप गर्दी तरि ती किती
देशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली
हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन् कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
इतुके होते तरीही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राह्मणवेषे तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जीवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली
Đăng nhập hoặc đăng ký để bình luận
Đăng nhập
Đăng ký